
कोल्हापूर : प्रतिनिधी
मानवी जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित व रोगमुक्त करण्यासाठी एड्सविषयी जागरूकता अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवजातीसमोर भीषण आव्हान ठरलेला एचआयव्ही–एड्स हा संसर्गजन्य आजार आजही विकसनशील देशांमध्ये घातक रूप दाखवत आहे. या रोगाचा प्रसार कसा होतो, त्याची प्रतिबंधक साधने कोणती, तसेच संक्रमित व्यक्तींविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक माहितीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला हवा, असे प्रतिपादन सी.पी.आर. रुग्णालयाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सौ. दीपा शिपूरकर व समुपदेशिका सौ. सुरेखा जाधव (पंचगंगा हॉस्पिटल) यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त रेड रिबन क्लब, आयक्युएसी विभाग, एनसीसी आणि एनएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले.
एनसीसी मुलींची सायकल रॅली ठरली आकर्षण
एनसीसी मुली विभागाच्या वतीने विवेकानंद कॉलेज–सी.पी.आर. हॉस्पिटल दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली. विद्यार्थिनींकडून एड्सविषयक संदेश फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
एचआयव्ही–एड्सविषयी जागरूकतेची शपथ
प्रा. गीतांजली साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना “रोगमुक्त–भयमुक्त समाज निर्मिती”ची शपथ देऊन एड्स प्रतिबंधावर सजग राहण्याचे आवाहन केले. के.आय.टी. रोटरॅक्ट क्लबचे प्रभावी पथनाट्य
के.आय.टी. रोटरॅक्ट क्लबने सादर केलेले पथनाट्य विद्यार्थ्यांचे विशेष लक्षवेधी ठरले. एड्सबाबतचे गैरसमज, भेदभाव व संक्रमण मार्ग यावर आधारित हा कार्यक्रम प्रभावी संदेश देणारा ठरला.मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रा. एम. आर. नवले, प्रा. एस. एस. जगताप, प्रा. एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.






