
कोतोली-पांडुरंग फिरींगे
जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून, ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक दुग्ध व्यवसायातील बदलती गती, सहकारी व खासगी संस्थांची भूमिका, तसेच २०४७ पर्यंत दूध व्यवसायात होणारे दूरगामी बदल या महत्त्वाच्या विषयांवर डॉ. नरके आपले विचार मांडणार आहेत. ‘गोकुळ’चे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग हा संघासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे.
प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित या परिषदेत देशातील दुग्ध व्यवसायाच्या वाटचालीवर देशपातळीवरील तज्ज्ञ सखोल चर्चा करणार आहेत. परिषदेला तामिळनाडूचे दुग्धमंत्री थिरु माणो तांगराज तसेच एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेष शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
डॉ. चेतन नरके यांच्या निवडीमुळे ‘गोकुळ’ दूध संघाच्या कार्याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.






