
कोल्हापूर: ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) साउथ व मध्य महाराष्ट्र या संघटनेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापुरातील हॉटेल ज्ञीप येथे उत्साहात पार पडली. एअरलाईन्स, हॉटेल इंडस्ट्री, व्हिसा, जीएसटी आणि टीसीएससारख्या ट्रॅव्हल एजंट्सना भेडसावणाऱ्या समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर तोडगा काढण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, TAAI ही संस्था ट्रॅव्हल एजंट्सच्या अडचणी थेट भारत सरकार आणि पर्यटन मंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी काम करते.
सेक्रेटरी याजडी मार्कर यांनी उपस्थित एजंट्सना जीएसटी (GST) आणि टीसीएस (TCS) बद्दल महत्त्वाची माहिती दिली. “बिना जीएसटी/टीसीएस असलेला व्यवसाय भविष्यात गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे सर्वांनी जीएसटीसह व्यवहार करावेत,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी व्हिसा, व्हीएफएसला लागणारा विलंब आणि व्हिसा मिळवण्यातील अडचणींवरही सविस्तर माहिती दिली.
TAAI सेंट्रल कमिटीचे सदस्य बहराम झाडेह यांनी एजंट्सचे प्रश्न सेंट्रल बॉडीमार्फत प्रभावीपणे सोडवण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर TAAK चे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सर्व ट्रॅव्हल एजंट्सना राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न सोडवण्यासाठी TAAI ची मेंबरशिप घेण्याचे आणि संघटनेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
या सभेमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या महत्त्वाची माहिती असेगो ट्रॅव्हल इन्शुरन्सचे एरिया मॅनेजर श्री सावंत यांनी दिली. तसेच, अकासा एअरलाईनचे व्यवस्थापक श्री धुमाळ यांनी आपल्या एअरलाईनच्या देश-विदेशातील नेटवर्कची आणि सोयीसुविधांची माहिती दिली.
यावेळी कोल्हापूर TAAK चे पदाधिकारी, तसेच सांगली व सातारा येथील ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. सेक्रेटरी याजदी साहेब यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.







